राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आतापर्यंत शासनाने एकूण ५६ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा केली आहे. यामध्ये नियमित कर्जदार, २०१९ च्या कर्जमाफीतील पात्र शेतकरी आणि थकीत कर्जदार अशा सर्वांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता पुढील यादी आणि अनुदानाबाबतची संपूर्ण स्थिती खालीलप्रमाणे आहे.
कर्जमाफीची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध होणार?
एकूण ५६ लाख खात्यांपैकी ३२ लाख २७ हजार शेतकरी हे थकीत कर्जदार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात सुमारे १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आधीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
उर्वरित १५ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. सध्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे १५ ऑगस्टनंतर दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या यादीमध्ये २०१९ च्या कर्जमाफीत पात्र ठरलेले १२ लाख ७१ हजार शेतकरी आणि इतर थकीत कर्जदारांचा समावेश असणार आहे.
१७ लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यावर बँक खात्यात निधी जमा होणार
कृषि मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीतील सुमारे ५ लाख १३ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्या कर्ज खात्यात निधी वर्ग करण्यासाठी राज्य सरकारकडून १३ हजार कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे. Farmer ID मधील त्रुटी किंवा कर्ज खाते क्रमांकातील तफावतीमुळे काही शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे; ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांसाठी ‘ओटीएस’ (OTS) योजना
ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे, अशा सुमारे २ लाख ९० हजार कर्जदार शेतकऱ्यांची ३ लाख ६९ हजार कर्ज खाती ही ‘ओटीएस’ (One Time Settlement) योजनेअंतर्गत येणार आहेत.
या शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम पूर्ण भरल्यास, त्यांना उर्वरित २ लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत काय स्थिती?
नियमित कर्ज भरणार्या सुमारे २३ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची शासनाची तयारी आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत पुढील २ ते ३ महिने नियमित कर्जदारांना अनुदानाच्या रकमेसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली असून यासाठी ३० तारखेपासून आंदोलनाची तयारी केली जात आहे.
पात्र असूनही नाव आले नसल्यास ‘ही’ करा कारवाई
जर एखादा शेतकरी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान कर्ज घेतलेला असेल आणि सर्व अटींनुसार पात्र असूनही कोणत्याही यादीत नाव आले नसेल, तर त्यांनी खालीलप्रमाणे तक्रार नोंदवावी:
-
कागदपत्रे: कर्ज खात्याची माहिती, कर्जाचे कागदपत्रे, Farmer ID, [Aadhaar Redacted], आणि एक लिखित अर्ज.
-
प्रक्रिया: हे सर्व दस्तऐवज आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे जमा करून तक्रार नोंदवावी.
-
तहसीलदार ही तक्रार जिल्हा स्तरावर पाठवतील आणि संबंधित बँकेकडून माहिती मागवून, शेतकरी पात्र असल्यास त्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली जाईल.

