उजनी धरणातील पाण्याचा साठा 121.44 टीएमसी
27 सप्टेंबर रोजी सकाळच्या माहितीनुसार, पुणे जिल्हा व आसपासच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामुळे दौंडकडून उजनी धरणामध्ये 13,213 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. उजनी धरणातील एकूण पाण्याचा साठा 121.44 टीएमसी झाला असून, त्यापैकी 57.78 टीएमसी पाणी उपयुक्त आहे. धरणाची पाणी पातळी 107.85% पर्यंत पोहोचली आहे.
मुख्य कॅनलमधील विसर्गात घट
काल दिवसभरात उजनी धरणातून मुख्य कॅनलमध्ये 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, रात्री 9 वाजल्यापासून त्यात 300 क्युसेकने घट होऊन, आता 1,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सीनामाडा डाव्या कालव्यातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 60 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ऊर्जा निर्मितीसाठी 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
भीमा नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग
उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्यामुळे पावसाच्या संभाव्य वाढीमुळे पाण्याच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो, असे उजनी धरण प्रशासनाने सांगितले आहे.
परतीचा पाऊस आणखी आठवडाभर राहणार
हवामान विभागाने परतीचा पाऊस आणखी एक आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उजनी धरणामधील पाण्याची स्थिती आणि पाण्याचा विसर्ग याबाबत प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.