छत्तीसगडमधील ‘डीप डिप्रेशन’चा महाराष्ट्रावर परिणाम
३० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या हवामान अपडेटनुसार, राज्यातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या छत्तीसगडच्या आसपास असलेले ‘डीप डिप्रेशन’ (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) आता विदर्भाच्या उत्तरेकडील भागातून मध्य प्रदेशातील इंदूरकडे मार्गस्थ होत आहे. यामुळे राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा आस असलेला पट्टा सक्रिय झाला असून, प्रणालीच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर ढगांची दाटी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
विदर्भात पावसाची दमदार हजेरी; गोंदिया-गडचिरोलीत अतिवृष्टी
गेल्या २४ तासांत विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अपेक्षेप्रमाणे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांत अतिवृष्टी झाली असून, भंडारा व चंद्रपूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळीही गडचिरोली, चंद्रपूरचा दक्षिण भाग, नागपूर, वर्धा आणि भंडाऱ्यात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतच अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड व बुलढाणा जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे.
जळगाव, बुलढाणासह ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
येत्या २४ तासांच्या अंदाजानुसार जळगाव, बुलढाणा, अकोला, तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेकडील भागात आणि अमरावतीच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पट्ट्यात काही मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांकडे पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
मराठवाडा, उर्वरित विदर्भ आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग, बीड, धाराशिव आणि लातूरमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया आणि नागपूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. नाशिकपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार, तर कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील.
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पावसाचा जोर ओसरणार
पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या दक्षिणेकडील भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. नाशिक आणि अहिल्यानगरचा काही भाग वगळता, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या उर्वरित भागात प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल. राज्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे जसजसे जावे, तसतसा पावसाचा जोर कमी होताना दिसेल; त्यामुळे सोलापूर व पुण्याच्या दक्षिण भागात पाऊस अत्यंत हलक्या स्वरूपाचा असेल.

