नमो शेतकरी लाभामुळे लाडकी बहीण योजनेत कपात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सुमारे 8,00,000 महिलांना आता फक्त ₹500 चाच हप्ता मिळणार आहे. कारण या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आधीच दरमहा ₹1,000 चा लाभ मिळतो. त्यामुळे दोन्ही योजनांमधून मिळणारी एकूण रक्कम ₹1,500 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आर्थिक तणावामुळे सरकारचा निर्णय
राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता सरकारने काही निकष लागू केले आहेत. त्यानुसार इतर योजनांमधून आधीच लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेत पूर्ण ₹1,500 ऐवजी फक्त ₹500 दिले जातील. नमो शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकार ₹6,000 आणि केंद्र सरकार ₹6,000 अशी रक्कम दरवर्षी देते, म्हणजेच दरमहा ₹1,000 मिळतो. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण मिळकत – ₹१५००, परंतु ‘लाडकी बहीण’चा वाटा कमी
या आठ लाख महिलांना:
- नमो शेतकरी योजनेतून मिळते – ₹१०००
- लाडकी बहीण योजनेतून मिळणार – ₹५००
- एकूण मिळकत – ₹१५०० प्रतिमाह
लाडकी बहीण योजनेत 2.5 कोटी महिलांची नोंदणी
लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेत 2.5 कोटींहून अधिक महिलांनी नोंदणी केली होती. प्रत्येक पात्र महिलेला दरमहा ₹1,500 देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पूर्ण रक्कम न देता अंशतः लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लाभार्थ्यांची पडताळणी सुरू
सध्या सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. आणखी किती महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळतो, याचा तपास केला जात आहे. जर आकडेवारीनुसार अशी संख्या वाढली, तर आणखी महिलांचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे.
सर्व महिलांचा हप्ता कमी नाही
महत्वाचं म्हणजे हा निर्णय केवळ नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवरच लागू होणार आहे. अन्य पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा दरमहा ₹1,500 हप्ता पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण योजनेतील सर्व लाभार्थ्यांचा हप्ता कमी होत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.