वचननाम्यातील आश्वासन पूर्ण करू – राठोड
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे मत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात दिलेलं आश्वासन पूर्ण केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. “शेतकरी समृद्ध व्हावा, त्याच्या आयुष्यात स्थैर्य यावं, हेच आमचं धोरण आहे,” असं ते म्हणाले.
कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा; योजना अंतिम टप्प्यात
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार चर्चा होत असून, कर्जमुक्तीसाठी आवश्यक त्या योजना सध्या अंतिम टप्प्यात आहेत. संजय राठोड म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकार करत आहे. शेतकरी हे राज्याच्या कणा आहेत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देणं हे आमचं प्राधान्य आहे.”
दीर्घकालीन आणि अल्पकालीन योजनांचा विचार
सरकार शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन योजना राबवण्याच्या तयारीत आहे. या योजनांमुळे केवळ कर्जमाफीच नाही, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनशैलीत सुधारणा घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. “शेतकऱ्याच्या घरात आनंद निर्माण व्हावा, त्याचा विकास व्हावा, हीच आमची भूमिका आहे,” असंही राठोड यांनी स्पष्ट केलं.