hawamaan Andaaz कमी दाबाचा पट्टा सक्रिय, काही भागांत गडगडाटी पावसाची शक्यता
8 एप्रिल सायंकाळी 6 वाजेपासून पुढील 24 तासांसाठी राज्यात हवामानात बदलाचे संकेत मिळत आहेत. विदर्भापासून मराठवाडा आणि दक्षिणेकडील भागांपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे हवामान अधिकच अस्थिर बनले आहे.
उष्णतेची लाट काही भागांत सक्रिय
राज्याच्या उत्तर भागात उत्तर व उत्तर-पश्चिमेकडून उष्ण वारे वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अकोला येथे तापमान 43 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, नांदेड, बीड, जालना, पुणे, नाशिक आदी भागांत तापमान 40 ते 42 अंश सेल्सियस दरम्यान राहू शकते.
काही ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी
आज सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा भागांत गडगडाटी पावसाचे ढग दिसून आले. आजऱ्यात गारपीट झाल्याचेही वृत्त आहे. महाबळेश्वर-पाचगणी परिसरात दुपारनंतर गडगडाटासह हलकासा पाऊस झाला आहे.
उद्याचा अंदाज: काही भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता
9 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा या घाटमाथ्याच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे. नागपूर परिसरातही गडगडाटी पाऊस होऊ शकतो. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे स्थानिक वातावरण तयार झाल्यास पावसाची शक्यता आहे.
इतर संभाव्य पावसाचे भाग
परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशिमच्या पूर्व भागातही पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पाऊस हा निवडक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहील. राज्यातील अन्य भागांत पावसाचा फारसा अंदाज नाही.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णता वाढणार
कोकणातील किनारपट्टीवर तापमान 36 अंश सेल्सियस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणात तापमान 34 ते 36 अंश दरम्यान राहू शकते. सातारा आणि कोल्हापूर भागात तापमान सुमारे 38 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
राज्यभरात उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि पावसाच्या संभाव्य भागांमध्ये सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.