अमरावती जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यातील पथरोट गावात गारांचा मोठा मारा झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे आणि गारपिटीनं परिसरात मोठा गोंधळ उडाला.
आंबा, संत्रा, केळी, लिंबू आणि कांद्याला फटका
गारपिटीचा सर्वाधिक फटका आंबा, संत्रा, केळी, लिंबू आणि कांदा या पिकांना बसला आहे. या पिकांची पाने फाटलेली असून फळं गळून पडलेली आहेत. शेतकऱ्यांनी फळबागांमध्ये झालेलं नुकसान पाहून हळहळ व्यक्त केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
हवेत गारवा; उकाड्यापासून दिलासा
या वादळी पावसामुळे आणि गारपिटीनंतर जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाकडून पंचनाम्याची अपेक्षा
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे आता स्थानिक प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शेतकरी संघटनांनी देखील आवाज उठवला आहे.