शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून दिलासा देणारी योजना
देशभरात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेत सहभागी राहून राज्य शासनाच्या माध्यमातून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबवली जात आहे, ज्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे. याच योजनेत रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
रब्बी हंगामासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
रब्बी हंगाम २०२४-२५ साठी अर्ज प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे. ज्वारी बागायती आणि जिरायती पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ असेल. हरभरा आणि गहू बागायतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे, तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग पिकांसाठी अर्ज प्रक्रिया ३१ मार्च २०२५ पर्यंत खुली राहणार आहे.
पीक | अर्जाची अंतिम मुदत |
---|---|
ज्वारी बागायती व जिरायती | ३० नोव्हेंबर २०२४ |
हरभरा आणि गहू बागायती | १५ डिसेंबर २०२४ |
उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग | ३१ मार्च २०२५ |
एक रुपयात पीक विमा – शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
राज्य शासनाच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेतून खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या योजनेतून २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांत शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. याच योजनेत खरीप हंगाम २०२४ साठी १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
अर्ज कसा करावा – सविस्तर मार्गदर्शन येणार
रब्बी हंगामाच्या या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज कसा भरायचा याचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या सर्वसमावेशक योजनेतून पिकांचे संरक्षण करण्याचे काम होत आहे.