रामचंद्र साबळे हवामानात बदल; राज्यात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार
रामचंद्र साबळे बुधवार दिनांक १६ एप्रिलपासून शनिवार १९ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत राज्यात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आज आणि उद्या म्हणजे १६ व १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रावर १००८ हेपॅस्कल इतका हवेचा दाब राहील, तर १८ आणि १९ एप्रिलला तो १००६ हेपॅस्कलपर्यंत खाली येईल. त्यामुळे वातावरणात बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्याफुलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाची शक्यता असलेले जिल्हे
पावसाचा प्रभाव कोकणातील सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जाणवेल. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या भागातही ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी २ ते ६ मिमी, तर विदर्भातील काही भागात ८ ते १६ मिमी पावसाचा अंदाज आहे.
कृषी सल्ला : कांदा आणि फुलशेतीसाठी सूचना
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कृषी सल्लाही देण्यात आला आहे. कांदा उत्पादकांनी काढणी केलेला कांदा पावसात भिजणार नाही याची खबरदारी घ्यावी. कांद्याचे ढिग ताटपद्रीने झाकावेत आणि शक्य असल्यास ते त्वरित सुरक्षित जागी हलवावेत. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी फुलांची काढणी सकाळी लवकर करावी, जेणेकरून ओलसर हवामानाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.
डॉ. रामचंद्र साबळे यांचा हवामानाचा अभ्यास
ही संपूर्ण माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अभ्यासावर आधारित आहे. त्यांनी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे पिकांचे व्यवस्थापन व साठवणूक याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.